Thursday, November 3, 2011

आज ही तितका नव्हे..


मी कधी नव्हतोच माझा,
आज ही तितका नव्हे..!
रंगला नव्हताच रंग,
आज ही तितका नव्हे..!!

राहिलो त्यांच्यात अन मी,
म्हणले त्यांसी आपुले..!
मी कधी नव्हतोच त्यांचा,
आज ही तितका नव्हे..!!

प्रश्न पडला आजवर का,
प्रीत नाही जोडली..!
प्रश्न हा नव्हताच साधा,
आज ही तितका नव्हे..!!

आजन्मीचे एकटेपण,
विसरले त्यांच्यासवे..!
पण संपला नव्हताच भास्,
आज ही तितका नव्हे..!!

वेळ ही आलीच आहे,
नवी अक्षरे गिरवायची..!
निरक्षर ही नव्हतो कधीच,
आज ही तितका नव्हे..!!

Wednesday, November 2, 2011

आम्ही कोण?


फुले आम्हीच भ्रमर आम्हीच,
प्रभुंची अवघी बाग़ आम्हीच..!
फुलात सुगंधीत विविध रंगीचा,
अखंड आनंद अनुभव आम्हीच..!!  

वक्र आम्हीच चक्र आम्हीच,
चित्रकारीचे ते आकार आम्हीच..!
सरळ कधी, वाकडे च कधी,
नज़रेचे फसवे डाव आम्हीच..!!

यासम आम्हीच त्यासम आम्हीच,
आमुच्या सारखे एकमेव आम्हीच..!
विरुद्ध ध्रुव साधतो समर्थ,
भल्या - बु-याचे संगम आम्हीच..!!

धवल आम्हीच कृष्ण आम्हीच,
सृष्टीचे सर्व रंग आम्हीच..!
असू जरी बहू रंगात विभक्त,
चित्रात सदैव संपूर्ण आम्हीच..!!